Tuesday, 2 August 2016

मनातल्या कविता


बरसत्या पावसाचे गाव
माझ्या मनात पारिजात
चिंब भिजले आभाळ आणि
गुलमोहराचे ठाव!!
ओले, हळवे, भिजले झाड
पाखरांच्या डोळ्यात आभाळ
पाना फुलात ओलेत्या रेघा
दारा पुढले, झुकले माड!! 
पावसात नादावले पाणी
कळ्या कळ्यात रेघा हळव्या
सावळ्या आभाळाची सावली
आणि सर्द भिजलेली गाणी!!
चिंब भिजलेले पान  पान
माझे मन पाऊस पाऊस
ओलावले सूर बासरीचे, धुंद
मोरपिसांचे मोहरले रान!! 
    - स्वप्नजा       - स्वप्नजा

मनातल्या कविता



विराणी

ओठांवरी  शब्द होते
डोळ्यात स्वप्न गाणी
वाऱ्यावरी हरवली
हळवी कुणी विराणी I

आकाश चंद्र तारकांचे
पाण्यात बिंब लाजरेसे
किनारा गच्चं भिजलेला
लाटेतूनी ती कहाणी I

ओल्या, स्तब्ध पायवाटा
पान पान  भिजलेले
दाटल्या धुक्यातली ती
पंखात निजली गाणी I

झंकारते देहातुनी कधीची
आर्त तान बासरीची
पापणीत मिटूनी गेली
हृदयामधील गाणी I

जा दूर तू असा कुठेही
मज प्यार हा किनारा
वाळूतल्या  खुणा पुसूनी
गेले निघून पाणी I
-     स्वप्नजा

मनातल्या कविता



भूल
हळदीच्या त्या ऊन्हाचे
पडे स्वप्न हे नभास
सावळ्या रेशीम धारा
घेती पंखात ऊन्हास।
पानोपानी सोनठसे
तसे उमटते ऊन
पाखरांच्या डोळ्यात
आला प्रकाश फुलून।
सजे थेंबांची रांगोळी
पडे पावसास भूल
सावळ्या मातीत आता
नवी कोवळी चाहूल।
क्षितिजावरी कोरली
सावळ्या मेघांची नक्षी
भिजल्या पंखात कोणी
गुमसूम झाला पक्षी।
              - स्वप्नजा

मनातल्या कविता



तू पावसात जाऊ नकोस

तू पावसात जाऊ नकोस
खर तर तू बसावसं घरातच
न्याहाळावास पाऊस खिडकीतून
तावदानावर पडलेले थेंब टिपावेत अलगद
तसा गँलरीतूनही झेलता येईल पाऊस तुला
कुंडीतलं झाड बघत
पानावर थरथरणा-या थेंबांसोबत
सेल्फी ही काढ तू, हवा तर
पण तू पावसात जाऊ नकोस।
तसा पाऊस भेटेल ही तुला
दूरदर्शनच्या बातम्यांतून
कुठे कुठे तुंबलेल्या पाण्याच्या,
अडकलेल्या लोकल्सच्या,
लँड स्लाईडच्या अन् ट्रॅफिक जँमच्या,
मरिन लाईन्सच्या उधाणलेल्या सागराच्या
बातम्यातून भेटतोच पाऊस
पाऊस तसा नेहमीच पडतो
म्हणून म्हणतो..... तू पावसात ......
म्हणून म्हणतो... तू पावसात जाऊ नकोस
पाऊस तुला भिजवेल चिंब...तेव्हा
अंगावरले थेंब तुझ्या,
तुझ्या केसातून लगडतील मोत्यांगत
ओठावर थरथरतील अलवारपणे
पदरातून भिजल्या, लपेटून घेतील कवेत
अन् धारांतून पेटत जाईल काजव्यांच झाड
ओल्या श्वासाचं उष्ण गाणं झिरपेल माझ्यात तेव्हा
तेव्हा माझ्यात घुसमटणा-या
पावसाचं काय करु, ते सांग
म्हणूनच....म्हणूनच म्हणतोय
तू पावसात......!!
- स्वप्नजा