Thursday, 4 August 2016

माझी कविता

क्षितिज......
सूर्य क्षितिजावर टेकतो तेव्हा
रस्त्यातून माणसांचे थवे
घरट्याच्या ओढीनं,
पाय ओढत चालत रहातात
रक्तातील मोहोळ तेव्हा
रहातं भिरभिरतं
अगणित वेदनांचा क्रूस पेलत
तरीही चेह-यावर मुखवटे चढवून
रस्त्यावरचा प्रत्येकजण
सांभाळत रहातो
आपल्याच विचारांची बेटं,
सावल्या गडद होत जातात
अंधारातच जागे झालेले रातकिडे
उपभोगत जातात मैथुनाचं आवर्तन
शरीराची सवय ....... नकळती , असल्यागत 
तृप्त - अतृप्त मनांचे सित्कार
उमटतात ओरखड्यांगत
रात्रीच्या अंधार भरल्या नग्न देहावर
एका आवर्तनातून दुसऱ्या आवर्तनाकडे
जन्मातून मृत्यूकडे, मृत्यूतून जन्माकडे,
आयुष्य रहातं सरकत
दिवसाकडून रात्रीकडे
सूर्य परत परत टेकतो क्षितिजावर
तेव्हा , माणूस नावाचा प्राणी
चालताच असतो कुठल्यातरी
न सापडणाऱ्या  क्षितिजाकडे !

              - स्वप्नजा

No comments:

Post a Comment