Thursday, 4 August 2016

माझी कविता

सवय
नि:शब्द स्तब्ध कुजबुज आजूबाजूला......
पदराच्या आडोशानं कधीपासून जपलेलं
आदिम काळाचं ओझं
हातावर, कपाळावर गोंदवलेलं
समाजानं बहाल केलेलं
स्त्रीत्वाचं कौतुक
मनात असीम फुललेल्या
स्वप्नांच्या कळ्या
लपवून.... जगण्याचं नाटक करत
मी जगतेय......
बेभान वाऱ्याचं भान सांभाळत
बांधून घेतेयं निखाऱ्याचं दान
पदरात...... तू दिलेलं
तरीही जपलेले...... जीवापाड
कधीपासून  ...... ?
उंबरठ्यापासून आकाशापर्यंत
तूच आखून दिलेली वाट चालतेय
क्षितिज पुकारत असताना ....... तरीही मी परततेय
उंबरठ्याच्या आतल्या जगात
अंतरातले कढ  अन सल जपण्याची
आता सवय झाली आहे
रक्ताळलेल्या पावलांवरील मेंदी
आता जुनी झाली आहे !
              - स्वप्नजा

No comments:

Post a Comment