Tuesday, 2 August 2016

मनातल्या कविता

तुझी वाट पाहातं

समईन विझावं अलगद
की गळावा प्राजक्त नकळत,
झरावा थेंब पाण्याचा
पानावरुन अलगद , आवाज ही न करता
तसाच येशील का तू माझ्या दाराशी
पाऊलही न वाजवता ?
की अवेळी आलेल्या पानगळतीत
गाळून पडावं हिरवं पानंही एखादं
किंवा उतरावी पाकळी लालचुटूक कोणी
गंधकोशात फुलाच्या ठेवून
आठवणींची जागा एखादी
तसा येशील का अलवार तू ?
माझ्या डोळ्यांत स्वप्नांची मोरपिसं ठेवून
अन तळव्यावर मऊसूत पिसांचे स्पर्श ठेवून
मनात झरणारा पाऊस जागा ठेवून, अविरत
लाटांतून उमटणारा सागर फेनफुलात जागताना
की भिजल्या पायवाटेवर ओलेते ठसे सांडताना
कसा येशील तू अंगणात माझ्या ?
तुझं येणं अटळ , आश्वासक
माझं तुझ्या सोबत येणंही ....... खरंच
तरीही
देवघरात तेवतेयं समई , माझ्या
आणि अंगणातला प्राजक्त ही फुलतोयं
तुझी वाट पाहातं .........  !
             - स्वप्नजा

No comments:

Post a Comment