Tuesday, 2 August 2016

मनातल्या कविता



तू पावसात जाऊ नकोस

तू पावसात जाऊ नकोस
खर तर तू बसावसं घरातच
न्याहाळावास पाऊस खिडकीतून
तावदानावर पडलेले थेंब टिपावेत अलगद
तसा गँलरीतूनही झेलता येईल पाऊस तुला
कुंडीतलं झाड बघत
पानावर थरथरणा-या थेंबांसोबत
सेल्फी ही काढ तू, हवा तर
पण तू पावसात जाऊ नकोस।
तसा पाऊस भेटेल ही तुला
दूरदर्शनच्या बातम्यांतून
कुठे कुठे तुंबलेल्या पाण्याच्या,
अडकलेल्या लोकल्सच्या,
लँड स्लाईडच्या अन् ट्रॅफिक जँमच्या,
मरिन लाईन्सच्या उधाणलेल्या सागराच्या
बातम्यातून भेटतोच पाऊस
पाऊस तसा नेहमीच पडतो
म्हणून म्हणतो..... तू पावसात ......
म्हणून म्हणतो... तू पावसात जाऊ नकोस
पाऊस तुला भिजवेल चिंब...तेव्हा
अंगावरले थेंब तुझ्या,
तुझ्या केसातून लगडतील मोत्यांगत
ओठावर थरथरतील अलवारपणे
पदरातून भिजल्या, लपेटून घेतील कवेत
अन् धारांतून पेटत जाईल काजव्यांच झाड
ओल्या श्वासाचं उष्ण गाणं झिरपेल माझ्यात तेव्हा
तेव्हा माझ्यात घुसमटणा-या
पावसाचं काय करु, ते सांग
म्हणूनच....म्हणूनच म्हणतोय
तू पावसात......!!
- स्वप्नजा

No comments:

Post a Comment