Friday, 5 August 2016

गहराइयाँ

 गहराइयाँ
धुँदलीसी धूप में
उदासी की खनक गूँजती हैं
मेरे दिल की गहराइयाँ
दर्द से तब सुलगती हैं

यूँ उठाके लम्हों की सर्द स्याही
रात पैरों को खिंचती, गुजरती हैं
मेरे दिल की गहराइयाँ
दर्द से तब सुलगती हैं

उजले चाँद की चांदनी में यूँ
परछाईयाँ लिपटती हैं दीवारोंसे
 मेरे दिल की गहराइयाँ
दर्द से तब सुलगती हैं

बोझल  पलकों पे बादल  सपनोंके
अँधेरे में निगाहे किसे ढूँढती हैं
मेरे दिल की गहराइयाँ
दर्द से तब सुलगती हैं

जानते पता हैं हम हर दर्द का
आँसू की लकीरें जिसे पूछती हैं
मेरे दिल की गहराइयाँ
दर्द से तब सुलगती हैं
              - स्वप्नजा
 

स्त्रीपण

स्त्रीपण
कुंकवाची लाल चिरी अन काळे चार मणी
माझं स्त्रीधन ....
या साम्राज्याची राणी बनून
कृत कृत्य करणारं आयष्य पदरात पाडून
मी वाचते ... संथपणे पाण्यावर
तरंगत जाणाऱ्या फुलाचं आत्मगीत
कधीतरी काठाला स्पर्शत
कधी प्रवाहाला भिडत
फुलं निघून जातं ..... अज्ञाताच्या प्रदेशात
तेव्हा
वर्तमानातील जीवनप्रवाह सांभाळत
मी चालते .... वर्षानुवर्ष, आयुष्याचा तोच तो रस्ता
वळणही झालीत त्याची केव्हाच पाठ
आता प्रवाहाविरुद्ध झेपावणं
मीच करून टाकलयं  बंद
ओठावरचा हुंदका अन आसवांचा तळं
खोल आत आता ठेवलंय दडपून ! 
              - स्वप्नजा
 

Thursday, 4 August 2016

माझी कविता

सवय
नि:शब्द स्तब्ध कुजबुज आजूबाजूला......
पदराच्या आडोशानं कधीपासून जपलेलं
आदिम काळाचं ओझं
हातावर, कपाळावर गोंदवलेलं
समाजानं बहाल केलेलं
स्त्रीत्वाचं कौतुक
मनात असीम फुललेल्या
स्वप्नांच्या कळ्या
लपवून.... जगण्याचं नाटक करत
मी जगतेय......
बेभान वाऱ्याचं भान सांभाळत
बांधून घेतेयं निखाऱ्याचं दान
पदरात...... तू दिलेलं
तरीही जपलेले...... जीवापाड
कधीपासून  ...... ?
उंबरठ्यापासून आकाशापर्यंत
तूच आखून दिलेली वाट चालतेय
क्षितिज पुकारत असताना ....... तरीही मी परततेय
उंबरठ्याच्या आतल्या जगात
अंतरातले कढ  अन सल जपण्याची
आता सवय झाली आहे
रक्ताळलेल्या पावलांवरील मेंदी
आता जुनी झाली आहे !
              - स्वप्नजा

माझी कविता

क्षितिज......
सूर्य क्षितिजावर टेकतो तेव्हा
रस्त्यातून माणसांचे थवे
घरट्याच्या ओढीनं,
पाय ओढत चालत रहातात
रक्तातील मोहोळ तेव्हा
रहातं भिरभिरतं
अगणित वेदनांचा क्रूस पेलत
तरीही चेह-यावर मुखवटे चढवून
रस्त्यावरचा प्रत्येकजण
सांभाळत रहातो
आपल्याच विचारांची बेटं,
सावल्या गडद होत जातात
अंधारातच जागे झालेले रातकिडे
उपभोगत जातात मैथुनाचं आवर्तन
शरीराची सवय ....... नकळती , असल्यागत 
तृप्त - अतृप्त मनांचे सित्कार
उमटतात ओरखड्यांगत
रात्रीच्या अंधार भरल्या नग्न देहावर
एका आवर्तनातून दुसऱ्या आवर्तनाकडे
जन्मातून मृत्यूकडे, मृत्यूतून जन्माकडे,
आयुष्य रहातं सरकत
दिवसाकडून रात्रीकडे
सूर्य परत परत टेकतो क्षितिजावर
तेव्हा , माणूस नावाचा प्राणी
चालताच असतो कुठल्यातरी
न सापडणाऱ्या  क्षितिजाकडे !

              - स्वप्नजा

Tuesday, 2 August 2016

मनातल्या कविता

तुझी वाट पाहातं

समईन विझावं अलगद
की गळावा प्राजक्त नकळत,
झरावा थेंब पाण्याचा
पानावरुन अलगद , आवाज ही न करता
तसाच येशील का तू माझ्या दाराशी
पाऊलही न वाजवता ?
की अवेळी आलेल्या पानगळतीत
गाळून पडावं हिरवं पानंही एखादं
किंवा उतरावी पाकळी लालचुटूक कोणी
गंधकोशात फुलाच्या ठेवून
आठवणींची जागा एखादी
तसा येशील का अलवार तू ?
माझ्या डोळ्यांत स्वप्नांची मोरपिसं ठेवून
अन तळव्यावर मऊसूत पिसांचे स्पर्श ठेवून
मनात झरणारा पाऊस जागा ठेवून, अविरत
लाटांतून उमटणारा सागर फेनफुलात जागताना
की भिजल्या पायवाटेवर ओलेते ठसे सांडताना
कसा येशील तू अंगणात माझ्या ?
तुझं येणं अटळ , आश्वासक
माझं तुझ्या सोबत येणंही ....... खरंच
तरीही
देवघरात तेवतेयं समई , माझ्या
आणि अंगणातला प्राजक्त ही फुलतोयं
तुझी वाट पाहातं .........  !
             - स्वप्नजा

मनातल्या कविता

सांज मंतरलेली

ती  अशीच होती सांज
तो क्षण ही  मंतरलेला
मोरपीस ठेवुनी हाती
तो निघून कान्हा गेला !

ती  अशीच होती सांज
नभास ही कळले होते
झरणाऱ्या धारांमधुनी
स्वर बासरीचे ओले होते!

ती  अशीच होती सांज
तो मलाच भिजवून गेला
जाताना माझे मीपण
तो वेडा घेऊन गेला !

ती  अशीच होती सांज
मी  नाहीच माझी आता
आर्त उरात उरले
तो हळू निघुनी जाता !
                - स्वप्नजा

मनातल्या कविता



वादळे

ही कोणती भाषा, तुज कळावया आता लागली
ही स्वप्ने कोणती, तुज खुणवाया आता लागली II

गाव हा फुलांचा, रस्ता हा भेटला तसा नवासा 
भिजली पाकळी अन, कळाया आता लागली II

वेडावल्या वयाच्या, जाणिवा वेगळ्या हव्याशा
खूण कोवळी नवी ही, छळाया आता लागली II

वादळे अंतरी काहुरांची, अनोळखी, भेटली
नाव मनाची कुठे, भरकटाया आता लागली II

रंग हळवे कोणते हे भोवताली माझ्या असे
काजळाची सावली तरी मिटाया आता लागली II
-    स्वप्नजा